नवी दिल्ली :कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत लस आपले मुख्य शस्त्र ठरणार आहे. मात्र या लसीमध्ये पोर्क जिलेटीनचा वापर होत असल्याचे समोर आल्यामुळे, मुस्लीम समुदाय संभ्रमात पडला होता. मात्र, आता भारतातील मुख्य इस्लामिक बोर्डांपैकी एक असलेल्या जमात-ए-इस्लामी हिंद (जेआयएच)ने शनिवारी या लसीला हिरवा कंदिल दाखवला आहे.
मुस्लिमांसाठी पोर्क निषिद्ध..
पोर्क, म्हणजेच डुकराचे मांस हे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यामुळे पोर्क जिलेटीनचा वापर ज्यामध्ये केला आहे अशी कोरोना लस घेणे योग्य ठरेल की नाही, असा संभ्रम मुस्लिम लोकांमध्ये पसरला होता. त्यावर आता जेआयएचचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनिअर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, की "जर औषधामध्ये किंवा लसीमध्ये पोर्क जिलेटीनचा वापर होत असेल, तर ती घेण्यास काही अडचण नाही. कारण तुम्ही हे मांस खात नाहीये, तर औषध म्हणून लसीचा डोस घेत आहात."
रझा अकॅडमीने केला चीनी लसीला होता विरोध..
मुंबईच्या रझा अकॅडमीने पोर्क जिलेटीनचा वापर करुन तयार होत असलेल्या लसीचा विरोध केला होता. पोर्क जिलेटीनचा वापर करुन तयार होणारी लस चीनकडून विकत घेऊ नका, असे आवाहन अकॅडमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी केले होते. सरकारने शक्यतो अशीच लस मागवावी ज्यामध्ये पोर्क जिलेटीनचा वापर केला गेला नसेल. मात्र, जर कोरोना लस तयार करण्यासाठी पोर्क जिलेटीनचा वापर अनिवार्य आहे, आणि पर्यायी लस उपलब्धच नाही, तर मात्र ही लसदेखील घेण्यास काही अडचण नसल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते.
अल्कोहोल असलेले खोकल्याचे औषध चालते, मग हेदेखील चालेल..
मोहम्मद इंजिनिअर म्हणाले, की इस्लाममध्ये अल्कोहोलही हराम आहे. मात्र, काही प्रमाणात अल्कोहोल असलेले खोकल्याचे औषध आपण घेतोच. त्यामुळे जर आपण औषध म्हणून एखादा पदार्थ घेतो आहोत, तर ते स्वीकारार्ह आहे. त्यामुळे ही लस सर्वांनी घ्यावीच असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा :भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी