बाह्य कुरापत आणि अंतर्गत सुरक्षा स्थितीसंदर्भात चिरंतन दक्षता म्हणून भारतीय लष्कराला स्वतःचे असे एक जबरदस्त अस्त्र मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन घडवणारे हे अस्त्र म्हणजे उपग्रह असून केवळ लष्कराच्या गरजा भागवण्यासाठी हा उपग्रह समर्पित केला जाणार आहे. लवकरच तो अवकाशात सोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. अत्यंत उच्च रिझोल्यूशन असलेल्या प्रतिमा घेण्याची क्षमता या उपग्रहाकडे आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे. लवकरच तो अवकाशात झेपावेल, असे या घडामोडीशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
लष्कराचे संदेशवहन, सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), टेहळणीच्या गरजा भागवणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे हे त्याचे मुख्य काम असेल. तसेच या उपग्रहामुळे लष्कराकडून केले जात असलेले सर्वात ताजे ड्रोन कार्यचालन सोपे होणार आहे, असेही या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. म्हणून लष्कराकडे त्याचे स्वतःचे अनन्य असे संपर्काचे नेटवर्क असेल. हे नेटवर्क सर्वाधिक सुरक्षित असून गुप्तता राखण्यास प्राधान्य असेल. सिग्नल्स संचालनालयाकडून ते हाताळले जाईल. या उपग्रहाची सुदूर संवेदनाची म्हणजे रिमोट सेन्सिंगची आणि टेहळणीची क्षमता यामुळे उपग्रह आकाशातील डोळा असेल.
पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करणे त्यामुळे लष्कराला सोपे जाणार आहे. त्याशिवाय सीमेवरील सैन्याच्या हालचालींवर देखरेख, सीमेलगत सर्वत्र तैनात केलेल्या सैन्याची ठिकाणे यावर नजर ठेवणे यासाठी लष्कराला त्याची मदत होणार आहे. सीमाप्रदेशाशिवाय, उपग्रह महत्वाची लष्करी ठिकाणे आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरही नजर ठेवणार आहे.
भारताच्या ५५ उपग्रहांपैकी, ८ ते १० उपग्रह लष्करी उद्देश्याची सेवा करतात. नजीकच्या भविष्यात आणखी लष्करी उपग्रह अवकाशात सोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत इस्रोने ३४ देशांच्या मालकीचे ३२७ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. पीएसएलव्ही-सी३७ या मोहिमेंतर्गत भारताने १५ फेब्रुवारी २०१७ ला विक्रमी संख्येने म्हणजे १०४ उपग्रह अवकाशात सोडले होते. ही अत्यंत महत्वाची कामगिरी होती. भारताचा कार्टोसॅट-३ उपग्रह नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाशात झेपावला होता. ५०० किमी. अंतरावरूनसुद्धा २५ सेंमी. इतकी बारीक वस्तु ओळखण्याची त्याची अद्भूत क्षमता आहे. भारतीय उपग्रहाने साध्य केलेले हे सर्वोत्कृष्ट पृथःकरण आहे.