नवी दिल्ली - भारत- चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. भारत सीमेवरील तणाव कमी करण्यास कटीबद्ध आहे. मात्र, चर्चेची प्रक्रिय क्लिष्ट असून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सतत पडताळून पाहण्याची गरज भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे.
'तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेशी आम्ही कटीबद्ध आहोत. ही प्रक्रिया क्लिष्ट असून सीमेवरील परिस्थिती सतत पडताळून पाहण्याची गरज आहे. लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चा सुरुच राहील, असे भारतीय लष्कराने अधिकृत व्यक्तव्य जारी केले आहे. सीमेवर दोन्ही देशांनी घेतलेले निर्णय योग्य रितीने लागू होत आहेत का? तसेच या निर्णयांची अंंमलबजावणी योग्य रितीने होत आहे का? हे पडताळून पाहण्याची गरज भारताने व्यक्त केली आहे. भारत आणि चिनी लष्करातील कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये 14 जुलैला लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये चर्चा झाली. चर्चेची ही चौथी फेरी होती.
विशेष प्रतिनिधी स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत ज्या बाबींवर एकमत झाले होते. त्याच्याशी सुसंगत चर्चा तणाव आणखी कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर सुरु आहे. तणाव कमी करण्याच्या पहिल्या टप्प्यातील निर्णयांची अंमलबजावणी कशी सुरु आहे, याचा आढावा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी चर्चेत घेतला. सीमेवरील परिस्थिती संपूर्णपणे पूर्वपदावर आणण्यासाठी चर्चा सुरु आहे.
तणाव कमी करण्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात येत आहे. पाँगयांग त्सो, डेपसांग हा सीमेवरील भागांचाही यात समावेश आहे. नियंत्रण रेषेवील सैन्य आणि शस्त्रात्रे ठराविक वेळेत मागे घेण्याची चर्चा सुरु आहे, असे सुत्रांनी सांगितले. गोग्रा, हॉट स्प्रिंग, गलवान व्हॅली या भागातून चिनी सैनिक मागे सरकले आहे. तसेच प्योंगयांग त्सो भागातील फिंगर फोर भागातून चीनने सैन्य मागे घेतले आहे. या भागातून सैन्य कमी करण्याची मागणी भारताने केली होती. त्यानुसार चीनने सैन्य कमी केले. मात्र, ही सर्व प्रक्रिया आणि निर्णय पडताळून पाहण्याची गरज भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे.