जम्मू काश्मीर - लष्कराने पाकिस्तानी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळला आहे. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये 'बॉर्डर अॅक्शन टीम' (बॅट) च्या ५ ते ७ घुसखोरांचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला. ही चकमक केरेन सेक्टरमध्ये झाली. ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह सीमेजवळच पडलेले असून ते माघारी नेण्याचा प्रस्ताव भारताने पाकिस्तानपुढे ठेवला आहे.
'बॉर्डर अॅक्शन टीम' ही पाकिस्तानच्या लष्कराची दहशतवादी कारवाया करणारे पथक आहे. कुपवाडा जिल्ह्याच्या केरेन सेक्टरमध्ये घुसखोरांनी भारतीय सीमाक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने त्याचा डाव हाणून पाडला. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चककमकीत ५ ते ७ जणांना ठार मारण्यात आले. पांढरा ध्वज दाखवत सैनिकांचे मृतदेह घेवून जाण्याचा प्रस्ताव पाकिस्तानपुढे भारताने ठेवला आहे. मात्र, अजूनही चकमक सुरुच असल्याने मृतदेह तेथेच पडून आहेत.