नवी दिल्ली - भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधले आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन चकमकीदरम्यान भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते.
हे स्मारक पूर्व लडाखच्या १२० पोस्ट येथे उभारण्यात आले असून या आठवड्याच्या सुरुवातीला त्याचे उद्धघाटन झाले. 'गलवानच्या शूर योद्ध्यांनी चायनिज लिबरेश आर्मीच्या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले. जीवाची पर्वा न करता या योद्ध्यांनी ऑपरेशन लिओपर्ड यशस्वी करून राष्ट्राचे संरक्षण करण्यात योगदान दिले' असे गौरवोद्गार वीरमरण आलेल्या जवानांसाठी या स्मारकावर कोरले आहेत.
पोस्ट १२० हे श्योक-दौलत बेग ओल्डी मार्गावर आहे. येथे बांधलेल्या स्मारकावर २० हुतात्मा जवानांची नावे कोरली आहेत. यात १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांचा समावेश आहे.
गलवान खोऱ्यात चीनच्या वाढत्या हालचालींना भारतीय सैन्याने विरोध केला होता. त्यानंतर चीनने दगड, लोखंडी खिळे आणि इतर शस्त्रांचा वापरकरून भारतीय सैन्यावर क्रूर हल्ला केला होता. याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले होते. या दरम्यान दोन्ही देशांचे सैनिक मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत. दोन्ही बाजूच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१५ जूनच्या या चकमकीत किती सैनिकांचा मृत्यू झाला हे चीनने अद्याप स्पष्ट केलेले नाही. एका अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार चीनच्या ३५ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.