श्रीनगर - अमरनाथ यात्रेकरुंना काश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने भारतीय वायुसेनेची मदत मागितली आहे. यात्रेकरुंना सी-१७ विमानाने राज्याबाहेरील कोणत्याही सुरक्षितस्थळी हलवण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. यानंतर, आज (शनिवार) काही वेळातच पहिले सी-१७ विमान श्रीनगर येथे पोहोचणार आहे.
शुक्रवारी भारत सरकारने पत्रक काढून दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यात्रेकरुंना परतण्यास सांगितले होते. यानंतर, विमानतळ, रेल्वे आणि इतर वाहतुक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी तिकिटासाठी लांब रांगा लागल्या आहेत. राज्यातील डोंगराळ भागात असणाऱ्यांना बसद्वारे श्रीनगरला पोहचवण्यात येत आहे. पेहलगाम बेस कॅम्पमध्ये असणाऱ्या सर्व यात्रेकरुंना श्रीनगरला रवाना करण्यात आले आहे. तर, सोनमर्ग आणि गुलमर्ग येथून यात्रेकरुंची रवानगी सुरू आहे. तर, भगवती बेस कॅम्प पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.