नवी दिल्ली - भारताला पहिले लढाऊ राफेल विमान ८ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मिळणार आहे. तर विमानांची पहिली बॅच २०२० साली मे महिन्यात मिळणार आहे. त्यासाठी वायू सनेने तयारी सुरू केली आहे. फ्रांस सरकार आणि डसॉल्ट एव्हिएशनमध्ये झालेल्या करारानुसार भारताला टप्याटप्याने ३६ विमाने मिळणार आहेत.
दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर भारताला मिळणार पहिलं राफेल विमान
भारताला पहिले लढाऊ राफेल विमान ८ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मिळणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वायू सेना प्रमुख बी. एस धनोआ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पहिले विमान घेण्यासाठी जाणार आहेत. एका कार्यक्रमामध्ये पहिले राफेल भारताला सुपूर्द केले जाणार आहे. राफेल लढाऊ विमानांनी भारतीय वायू सेनेची ताकद आणखी वाढणार आहे. राफेल विमानांची पहिली बॅच हरियाणातील अंबाला येथील वायू सेना तळावर सेवेत दाखल होणार आहे.
आधीच्या योजनेनुसार पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणुनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी दसरा सणही आहे. त्यामुळे या दिवसाची निवड करण्यात आली.
पाकिस्तान सीमेपासून फक्त २२० किमी अंतरावर असल्यामुळे अंबाला एअर फोर्स स्टेशनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील हसीमारा वायू सेनेच्या तळावर राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच तैनात केली जाणार आहे.