नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नव्या नियमांनुसार आता मेट्रो सेवा ७ सप्टेंबपासून सुरू होणार आहे. मेट्रो सेवा देशभरात २२ मार्चपासून कोरोनाच्या प्रसारानंतर बंद ठेवण्यात आली होती. देशभरात अनलॉकचा हा चौथा टप्पा आहे. नवी मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली असून, ३० सप्टेंबरपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
कोरोना नियमावलीचे पालन करत टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी नागरी आणि गृह मंत्रालयाकडून नियमावली जारी केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
अनलॉक ४ मधील महत्त्वाचे मुद्दे
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १०० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होऊ शकत नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे.कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्क घालण्याचे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सहभागी व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग, हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
खुल्या चित्रपटगृहांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश ऑनलाईन शिक्षणाच्या कामासाठी ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेत बोलावू शकते. यास २१ सप्टेंबरपासून फक्त कन्टेंन्मेट झोन बाहेर परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार केंद्राशी चर्चेशिवाय कंन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी व्यक्तींची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत आधीच्या नियमानुसारच राहील. तर २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी देण्यात आली आहे.
9 वी ते 12 वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालया जाऊ शकतात. मात्र, यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. भारतात मागील २४ तासात ७६ हजार ४७२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ३४ लाखांच्याही पुढे गेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात ७० हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आत्तापर्यंत ६२ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला आहे.