नवी दिल्ली -इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने 'सी-१७ ग्लोबमास्टर' हे विमान पाठवले आहे. सोमवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास ते तेहरानमध्ये उतरेल. तसेच, मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास तेहरानहून निघून, सकाळी साडेनऊच्या सुमारास मायदेशी परत येईल. सी-१७ ग्लोबमास्टरचे कप्तान, विंग कमांडर करन कपूर यांनी ही माहिती दिली.
इराणमध्ये कोरोना विषाणूच्या दहशतीखाली सुमारे १,२०० भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि भाविकांचा समावेश आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मागील गुरूवारी संसदेत सांगितले होते. यासोबतच ते म्हणाले होते, की इराण सरकारने परवानगी दिल्यास भारतीयांना परत आणण्याआधी इराणमध्येच त्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र उभारण्यात येईल.