नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाचा ससंर्ग झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 8 हजार 447 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संभाव्य रुग्णांची चाचणी घेण्याची संख्याही सरकारने वाढविली आहे. आज अखेरपर्यंत देशभरात 1 लाख 81 हजार 28 नागरिकांची कोरोना चाचणी घेतल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले आहे.
एकूण 1 लाख 95 हजार 748 जणांचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 81 हजार 28 नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे. आज(रविवार) रात्री 9 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने देशात रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरुवातीला चाचण्या कमी प्रमाणात घेण्यात येत होत्या मात्र, आता दरदिवशी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.