नवी दिल्ली - अमेरिका पाठोपाठ भारताने आपल्या विमानांना इराक, इराण आणि आखाती देशांवरून उड्डाणे टाळण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.
इराकमधील दुतावास आणि इरबील प्रांतातील कांऊन्सलेटचे काम सुरूच राहणार असल्याचे भारताच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. इराकमधील इरबील प्रांतातील अमेरिकेच्या तळावर इराणने रॉकेट हल्ला केला. त्यामुळे तेथील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील कांऊन्सलेट भारतीयांसाठी काम करत राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अमेरिका-इराण देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाचे काम नसेल तर इराकमध्ये प्रवास करणे टाळावे, इराकमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही देशांतर्गत प्रवास टाळावा, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. इराकमधील अल-अस्साद आणि इरबील प्रांत येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. काल (मंगळवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इराणने १० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागली. या वृत्ताला अमेरिकेने दुजोरा दिला आहे.