नवी दिल्ली - नागरिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करत भारताने 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. या अॅप्समुळे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. मात्र, चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. भारत- चीनमधील आर्थिक सहकार्याची गती शाबूत राखण्याची गरज असल्याचे चीनच्या भारतातील दूतावास कार्यालयाने म्हटले आहे.
'भारताने संदिग्ध आणि कोणताही आधार नसलेल्या कारणांवरून काही चिनी मोबाईल आधारित अॅप्सवर बंदी घातली. हा निर्णय भेदभावपूर्ण असून योग्य आणि पारदर्शी व्यापार प्रक्रियेच्या विरोधात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाचा भारताने गैरवापर केला. तसेच जागतिक व्यापर संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या संशयावरुन भारातने हा निर्णय घेतला. हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापार, ई कॉमर्स, बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असल्याचे भारतातील चिनी दूतावास कार्यालयाचे प्रवक्ते जी राँग यांनी म्हटले आहे.