हैदराबाद - लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चीनने 'स्टेट्स को'चे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करताना झालेल्या हिंसाचाराला भारताने चीनला दोषी ठरविले आहे. या हिंसक संघर्षात कमांडिंग ऑफिसरसह किमान तीन भारतीय सैनिक शाहिद झाले. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा जारी केलेल्या औपचारिक निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी रात्री झालेल्या हिंसक झडपांमध्ये आणि चकमकीत भारतीय सैन्य व चिनी पीएलएचे नुकसान होऊन दोन्ही बाजूच्या सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारत-चीन सीमेवर १९७५ नंतर पहिल्यांदाच हिंसाचाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांच्या तणावानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान सुरु असलेल्या 'डी-एस्कलेटिंग'ची (तणाव निवळण्यासाठी चर्चा) प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली.
“पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी भारत आणि चीन हे दोन्ही देश सैन्य आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे चर्चा करीत आहेत. ६ जून २०२० रोजी वरिष्ठ कमांडर्सच्या बैठकीत याबाबतीत सकारात्मक चर्चा होऊन तणाव निवळण्याच्या दृष्टीने सहमती सहमती दर्शविली गेली होती. त्यानंतर, उच्च पातळीवर झालेल्या सहमतीच्या दृष्टीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राउंड कमांडर्सनी अनेक बैठका घेतल्या,” असे एमईएचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.
“आमची अशी अपेक्षा होती की हा प्रश्न सहजतेने मार्गी लागेल मात्र, चीनच्या बाजूने गलवान व्हॅलीमधील अॅक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोला (एलएसी) सन्मान झाला नाही. १५ जून २०२० रोजी उशिरा-संध्याकाळी आणि रात्री, 'स्टेट्स को'चे एकतर्फी उल्लंघन करण्याचा चिनी बाजूने प्रयत्न झाल्यामुळे ही हिंसक घटना घडली. उच्च पातळीवरील सहमती झालेल्या कराराचे चीनच्या बाजूने पालन झाले असते तर दोन्ही बाजूंची जीवितहानी टाळता आली असती,” असे श्रीवास्तव म्हणाले.
भारतीय सैन्याने हिंसा भडकावल्याचा आरोप करत निषेध नोंदविणाऱ्या बीजिंगमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या टीकेला चीनच्या सरकारी माध्यम कंपनी ग्लोबल टाईम्सने पाठिंबा देत त्याला प्रसिद्धी दिली होती. तर एका वेगळ्या निवेदनाद्वारे पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुली यांनी भारतीय सैन्याने ६ जूनरोजी झालेल्या सहमतीचा भंग केल्याचा आरोप केला.