नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीवरील चीनने केलेला सार्वभौमत्वाचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. चीनचा दावा अतिशोयोक्ती आणि असमर्थनीय असून भारत कधीही मान्य करणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
गलवान व्हॅलीवरील चीनचा दावा त्यांनी भूतकाळात घेतलेल्या भूमिकांशी देखील सुसंगत नाही. चीनने अतिक्रमण करण्याच्या प्रयत्न केला मात्र, भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले. गलवान व्हॅलीसंबधीची भूमिका इतिहासातच स्पष्ट झाली आहे. आता नियंत्रण रेषेबाबत चीनने केलेला दावा कधीही मान्य केला जाणार नाही, असे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाच प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.
15 जूनला (सोमवारी) गलवान व्हॅली परिसरात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये नियंत्रण रेषेवर हाणामारी झाली. यामध्ये 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. चीनने किती जवान ठार झाले याची माहिती जाहीर केली नाही. मागील 45 वर्षांत पहिल्यांदा भारत चीन सीमेवर जीवितहानी झाली आहे.
'भारतीय सैनिकांना नियंत्रण रेषेवरील गलवान व्हॅलीसह इतर सर्व सेक्टरची बारकाईने माहिती आहे. जवानांकडून सीमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. नियंत्रण रेषेच्या पलीकडे भारताने कोणतीही कृती केली नाही. बऱ्याच काळापासून आपले सैनिक या परिसरात गस्त घालत आहेत'.
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यास चीनने मे महिन्याच्या मध्यापासून सुरुवात केली. प्रत्येक वेळी त्यांना भारतीय सैनिकांचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत ठरल्यानुसार चीन सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रामाणिकपणे अनुकरण करेल, अशी भारताला आशा आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.