नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दरही वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 682 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 26.59 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले.
आतापर्यंत 10,632 लोक या संसर्गजन्य आजाराने बरे झाले आहेत. नवीन प्रकरणांच्या वाढीचा दरही थोड्या काळासाठी स्थिर झाला आहे. देशात 130 हॉटस्पाट तर 284 नॉन हॉटस्पाट जिल्हे आहेत. तसेच 319 जिल्हे संसर्गमुक्त आहेत. भारताने आतापर्यंत 10 लाख चाचण्या पार केल्या असून सध्या एका दिवसात 74,000 चाचण्या घेण्यात येत असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगतिले.