नवी दिल्ली : देशात गुरुवारी एकाच दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्यांची नोंद झाली. दिवसभरात तब्बल ८.३ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.
आज घेण्यात आलेल्या चाचण्यांनंतर देशभरातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या २.६८ कोटींवर पोहोचली आहे. येत्या काळात दिवसाला दहा लाख कोरोना चाचण्या घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लक्ष्य आहे.
विशेष म्हणजे, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशात एका दिवसाला २.३ लाख चाचण्या होत होत्या. तर ५ ते ११ ऑगस्टदरम्यान दररोज सहा लाखांहून अधिक चाचण्यांची नोंद झाली आहे.
जानेवारीमध्ये देशात कोरोना चाचणी करणारी केवळ एक प्रयोगशाळा उपलब्ध होती. आज देशभरात १,४३३ प्रयोगशाळांमधून कोरोना चाचणी करता येऊ शकते. यामध्ये ९४७ प्रयोगशाळा सरकारी, तर ४८६ खासगी आहेत.
एकूण १७ लाख कोरोनामुक्त..
आज ५६,३८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर देशभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १७ लाखांवर पोहोचली आहे. यानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अॅक्टिव रुग्णांपेक्षा (६ लाख ५३ हजार ६२२) दहा लाखांहून अधिक पुढे गेली आहे.
दरम्यान, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंगने (सीएसएसई) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत २३ लाख ९६ हजार ६३७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका (५१ लाख ९७ हजार ७४९ रुग्ण) आणि दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील (३१ लाख ६४ हजार ७८५ रुग्ण) आहे.
तसेच कोरोनामुळे बळी गेलेल्या संख्येच्या आकडेवारीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका (१ लाख ६६ हजार ३८), त्यापाठोपाठ ब्राझील (१ लाख ४ हजार २०१) आणि मेक्सिकोचा (५४ हजार ६६६) क्रमांक लागतो.