हैदराबाद- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी देशातील कोरोना चाचण्या आणि पीपीई किट्सबाबतच्या सर्व गैरसमज दूर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात दिवसाला तीन लाख पीपीई किट्स तयार होत आहेत. तसेच देशभरातील सुमारे ४५० प्रयोगशाळांमध्ये मिळून प्रतिदिन ९५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाहूयात ईटीव्ही भारतचे संपादक निशांत शर्मा यांनी डॉ. हर्षवर्धन यांची घेतलेली विशेष मुलाखत..
- प्रश्न - देशाची कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे का?
कोरोना विषाणूला प्रतिसाद देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपण कंबर कसली आहे. आपण कित्येक विशेष घटना पाहिल्या आहेत. त्यात पंतप्रधानांनी जनतेला थेट संबोधित करणे, २० लाखांहून अधिक नागरिकांची सीमेवरच तपासणी करणे, आणि जवळपास दहा लाख लोकांना निरिक्षणाखाली ठेवणे. जनता कर्फ्यू, आणि लॉकडाऊन यादेखील अशाच विशेष घटना, ज्यामाध्यमातून आपण कोरोनाशी दोन हात करत आहोत.
इतर देशांशी तुलना करता आपल्याला हे दिसून येईल, की या उपायांमुळेच भारत सध्या कोरोनाला इतरांहून चांगल्या पद्धतीने तोंड देत आहे. जगातील सर्वात कमी मृत्यूदर हा भारतात आहे. तसेच देशातील ३० टक्क्यांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. केवळ चार महिन्यांमध्ये आपण कोरोना तपासणीसाठी देशात ४५० प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. देशात एकूण मिळून आपण दररोज सुमारे ९५ हजार कोरोना चाचण्या घेत आहोत.
- प्रश्न - कोरोनाच्या रुग्णांमध्ये आपल्याला दिवसेगणिक अधिक वाढ दिसून येत आहे. चाचणी केंद्रांची वाढ झाल्यामुळे असे होत असावे का?
कोरोनाच्या रुग्णांमध्ये अगदी एवढ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत नाही. रुग्णवाढीचा आलेख पाहिला असता तो बराच स्थिर असल्याचे दिसून येईल. गेल्या २४ तासांमध्ये आपण ८५ हजार लोकांची तपासणी केली. जेव्हा सुरूवातीला आपण चाचण्या करत होतो, तेव्हा हाच दर २००० चाचण्या प्रतिदिन एवढा होता.
आम्ही कोरोनासोबतच सारी आणि इली या आजाराच्या रुग्णांचाही शोध घेत आहोत. गेल्या ३ महिन्यांमध्ये मिळून आपल्या देशात ५० ते ६० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. याची तुलना कोणत्याही लहान देशाशी केली असता, असे दिसून येईल की बऱ्याच देशांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आपल्याकडे केवळ ३ टक्के मृत्यूदर आहे, तर जागतिक मृत्यूदर हा ७ ते ७.५ आहे.
- प्रश्न - या महिनाअखेरपर्यंत देशात कोरोनाची चाचणी करणाऱ्या किती प्रयोगशाळा उभारण्याचा तुमचा मानस आहे? सध्या कोरोना चाचण्यांबाबत सरकारची रणनीती काय आहे? सरकारची सध्याची रणनीती पुरेशी कशी आहे?
जानेवारीमध्ये जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला, तेव्हा देशात केवळ एकच प्रयोगशाळा होती, जिथे कोरोनाची चाचणी करणे शक्य होते. काही नमुने आम्ही अमेरिकेमध्ये तपासणीसाठी पाठवत होतो. आता, मेच्या दुसऱ्य़ा आठवड्यामध्ये आपल्या देशामध्ये ४७२ प्रयोगशाळा आहेत जिथे कोरोनाची तपासणी होऊ शकते. यांपैकी २७५ प्रयोगशाळा या सरकारी आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार सरकारने धोरण आखले असून, त्यानुसारच दिवसाला ९५ हजार चाचण्या करण्याच्या क्षमतेपर्यंत आपण पोहोचलो आहोत.
- प्रश्न - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दाखवलेली कोरोना रुग्णांची संख्या, आणि काही राज्य सरकार दाखवत असलेली संख्या यांमध्ये तफावत का आहे?
खरंतर कोरोना रुग्णांची संख्या ही क्षणाक्षणाला बदलते आहे. प्रयोगशाळांमध्ये आलेल्या चाचण्यांच्या अहवालानुसार ही संख्या बदलते. प्रयोगशाळांमधून हे अहवाल प्रशासनाकडे पाठवले जातात. तेथून पुढे आयडीएसपीला आणि आयसीएमआरला. या सर्व ठिकाणांहून गोळा केलेला अंतिम डेटा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे येतो, आणि त्यानंतर तो जाहीर केला जातो. तोपर्यंत आणखी काही चाचण्यांचे अहवाल आलेले असतात. त्यामुळेच आकड्यांमधील ही तफावत दिसून येते.
- प्रश्न - सध्या कोणत्या हॉटस्पॉट्सवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय विशेष लक्ष ठेऊन आहे?
आपल्याला माहिती आहे, देशाला तीन झोन्समध्ये विभागले गेले आहे - रेड, ऑरेंज आणि ग्रीन. जिल्हानिहाय पाहता, देशात १३० जिल्हे हे हॉटस्पॉट आहेत. तर, २८४ जिल्हे हे नॉन-हॉटस्पॉट आहेत. तसेच ३१९ जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळून आला नाही.
प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये विविध गोष्टींवरून रणनीती आखली जात आहे. लोकसंख्या, प्रसाराचा वेग अशा विविध गोष्टींवर आधारित विविध योजना या जिल्ह्यांमध्ये राबवल्या जात आहेत. कन्टेन्मेंट झोन्समध्ये हाऊस-टू-हाऊस सर्वे केले जात आहेत. हॉटस्पॉट्समध्ये स्थानिक पथके, रॅपिड रिस्पॉन्स टीम, सर्विलियन्स टीम, वैद्यकीय महाविद्यालयाची आणि केंद्र सरकारची पथके ही सर्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे काम करत आहेत.
- प्रश्न - सार्वजनिक आरोग्य उपायांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राच्या आवाहनास राज्ये कशी प्रतिक्रिया देतात? केंद्रापुढे यामध्ये कोणती आव्हाने आहेत?