नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत आणि चीनसीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कारण, चिनी लष्कराने दोन्ही देशांच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार नियंत्रण रेषेवरून मागे जाण्यास नकार दिला आहे. नियंत्रण रेषेवरील काही भागात चीन ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे आता सीमेवर दिर्घकाळ सज्ज राहण्यासाठी लष्कराने तयारी सुरु केली आहे. तीव्र हिवाळ्यात समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या या कठीण भूभागात भारतीय लष्कर चीनला उत्तर देण्यासाठी तयारीला लागले आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत सीमेवरील सैनिकांना अन्न आणि इतर साहित्याचा पुरवठा करण्यासाठी लष्कराकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी 14 जुलैला कॉर्प्स कमांडर स्तरावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय लागू करण्यास चीन तयार नाही. त्यामुळे परिस्थितीत तणावपूर्ण झाली आहे.