नवी दिल्ली -खासदार राहुल गांधींनी आज रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे संवांद साधला. कोरोनाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, यावरदेखील राहुल गांधींनी राजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी रघुराम राजन यांनी सांगितले की कोरोना विषाणुच्या या संकटकाळात भारताला गरिबांना जगवण्यासाठी ६५ हजार कोटी रुपये लागतील.
सध्याच्या परिस्थितीत देशातील गरजूंना मदत करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, या राहुल गांधीच्या प्रश्नाला राजन यांनी उत्तर दिले. पुढे बोलताना राजन सांगतात, की देशाला ६५ हजार कोटी लागतील आणि आपल्या जीडीपीला ही रक्कम परवडणारी आहे. आपल्या देशाचा जीडीपी २०० लाख कोटी आहे. त्यापैकी ६५ हजार कोटी ही फार मोठी रक्कम नाही. गरीबांना जगवायचे असेल, तर एवढी रक्कम खर्च करणे गरजेचे आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन उघडण्यासाठी भारताने विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे ठरेल. तसेच अर्थव्यवस्थादेखील लवकरात लवकर खुली करावी लागेल. अशा संकटाच्या वेळी आपण विभाजीत राहण्याचा धोका स्वीकारूशकत नाही, असे राजन सांगतात.
भारत संधी शोधू शकतो -
कोरोनानंतर भारताला काही धोरणात्मक फायदा होईल का, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. या उत्तरात राजन सांगतात की अशा संकटांचा, घटनांचा क्वचितच सकारात्मक फायदा देशाला होऊ शकतो. काही असे मार्ग आहेत, ज्याद्वारे देश याचा फायदा घेऊ शकतो.
अशा परिस्थितीत भारत आपल्या उद्योगांसाठी पुरवठा साखळी शोधू शकेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक व्यवस्थेत अधिक चांगले स्थान आणि अवस्था असलेल्या देशांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतो, असे त्यांनी सुचविले.