मुंबई- भारत २०२७ पर्यंत चीनला पछाडून जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता आहे. २०५० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत २७ करोड ३ लाखांची वाढ होऊ शकते. याबरोबरच २१ व्या शतकाच्या अखेरीस भारत जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश राहु शकतो, असा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत २०२७ पर्यंत चीनला मागे टाकणार भारत - संयुक्त राष्ट्रसंघ - कोटी
'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट २०१९' अहवालानुसार, पुढील ३० वर्षात जगाची लोकसंख्या २ अब्ज वाढण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनने 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट २०१९' चा अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार, पुढील ३० वर्षात जगाची लोकसंख्या २ अब्ज वाढण्याची शक्यता आहे. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ७ अब्ज ७० कोटी वाढून ९ अब्ज ७० कोटी होण्याची शक्यता आहे. तर, २१ व्या शतकाच्या अखेरीस लोकसंख्या ११ अब्जाच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, मानवाचे सरासरी वय १९९० सालापर्यंत ६४.२ वर्ष होते. तर, २०१९ साली यात वाढ होऊन ते ७२.६ वर्षांपर्यंत पोहचले आहे. २०५० पर्यंत मानवाचे सरासरी वय ७७.१ इतके होण्याची शक्यता आहे. २०५० पर्यंत होणाऱ्या लोकसंख्या वाढीत सर्वात जास्त वाटा भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथिओपिया, तंजानिया, इंडोनेशिया, मिस्त्र आणि अमेरिकेचा असणार आहे.