बंगळुरू -दोन महिन्यांपूर्वी 'चांद्रयान-२' हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरले होते. मात्र त्यामुळे इस्रो खचून गेले नाही. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा इस्रो पुन्हा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय अवकाश संशोधन केंद्राने (इस्रो) एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तिरुवअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक एस. सोमनाथ हे या समितीचे अध्यक्ष असतील. विक्रम साराभाई अवकाश केंद्र हे इस्रोच्या सर्व अवकाश यात्रांसाठी लाँचिंग प्रक्रियेमध्ये मुख्य कामगिरी बजावते. त्यांच्यावरच आता 'चांद्रयान-३' चा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असणार आहे. इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एका वर्षाच्या आत हा आराखडा तयार करण्याचे निर्देश या समितीला दिले गेले आहेत.
'चांद्रयान-३'च्या लाँचिंगसाठी पुढील नोव्हेंबरमध्ये चांगली संधी आहे. यावेळी रोव्हर, लँडर आणि लँडिंग ऑपरेशन्सच्या बाबत अधिक काळजी घेण्यात येईल. तसेच 'चांद्रयान-२'च्या वेळी ज्या कमतरता आढळल्या होत्या, त्याही टाळण्यात येतील, अशी माहिती बंगळुरूमधील सूत्रांकडून मिळाली आहे.