नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना जयंतीदिनी अभिवादन करताना त्यांच्या कामगिरीविषयी भाष्य केले. तसेच लॉकडाऊन, 2020 वर्षातील संकटे, भारत-चीन वाद याविषयावरही ते बोलले.
मन की बात : 'भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख उत्तर दिले' - @PMOIndia
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना जयंतीदिनी अभिवादन करताना त्यांच्या कामगिरीविषयी भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे -
- कार्यक्रमाने 2020 या वर्षातला अर्धा प्रवास पूर्ण केला. या काळात आपण अनेक विषयांवर चर्चा केली. सध्या जागतिक साथीचा आजार पसरला, मानवजातीवर संकट आलं आहे, त्यावर आपली चर्चा जास्त झाली आहे.
- सध्या लोकांच्या चर्चेत 2020 हे वर्ष कधी संपणार हा एकच विषय आहे. हे वर्ष चांगलं नाही, शुभ नाही. लोकांना वाटतंय की हे वर्ष लवकरात लवकर संपून जावं. देशावर संकट येत गेली. एकाच वेळी इतकी सगळी संकटं येण, हे कमी ऐकायला-बघायला मिळतात. संकट येत आहेत. म्हणून संपूर्ण वर्ष वाईट आहे, असे मानायची गरज नाही. एका वर्षात एक आव्हान येउ द्या नाहीतर पन्नास अडचणी येऊ द्या त्यामुळे आपण डगमगून जायची गरज नाही.
- माजी पंतप्रधान, श्री पी व्ही नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दीची वर्षाचा आज पहिला दिवस आहे. नरसिंहराव यांना पाश्चात्य साहित्य आणि विज्ञानाचेही ज्ञान होते. ते भारतातील, सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. श्री नरसिंह राव, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर होते.
- भारताचा इतिहास हा आव्हानं आणि संकटातून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे, अनेकांनी भारतावर आक्रमणं केली, संकटात लोटलं. मात्र, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडला. संकटाच्या काळातही, पत्येक क्षेत्रात सृजनाची प्रक्रिया सुरूच राहिली आणि संस्कृती अधिकाधिक बहरत-फुलत राहिली, देश पुढे गेला. भारताने नेहमीच, संकटांचा उपयोग यशाची शिडी चढण्यासाठी केला आहे. याच भावनेनं आजही आपल्याला या संकटांमधून मार्ग काढत पुढे जायचे आहे.
- जर 130 कोटी देशबांधवांनी संकटावर मार्ग काढत पुढे पाउल टाकलं तर हेच वर्ष, देशासाठी नवनवे विक्रम रचणार सिध्द होईल. देश नव्या उंचीवर पोहोचेल. मला तुम्हा सर्वांवर आणि आपल्या देशाच्या महान परंपरेवर विश्वास आहे.
- लद्दाखमध्ये भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख उत्तर देण्यात आले. भारताला जसे मैत्री जपणे माहित आहे, तसेच डोळ्याला डोळा भिडवत योग्य उत्तर देणेही माहिती आहे.
- लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात घ्यायची आहे. जर तुम्ही मास्क वापरत नसाल, आवश्यक काळजी घेत नसाल, तर स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याला संकटात टाकत आहात, म्हणूनच, आपलीही काळजी घ्या आणि इतरांचीही. 2020 हे वर्ष दशकात एक नवी दिशा देणारे वर्ष म्हणून सिध्द होईल. हाच विश्वास मनात बाळगत, तुम्ही सर्व लोक सुद्धा पुढे जा, निरोगी रहा, सकारात्मक रहा, असे मोदी म्हणाले.