नवी दिल्ली - भारताने बुधवारी स्वदेशी बनावटीच्या 'अँटी टँक गाईडेड मिसाईलची' (एम-पीएटीजीएम) यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आंध्रप्रदेशच्या कुर्नुल येथील फायरिंग रेंजवर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची ही तिसरी चाचणी होती.
एम-पीएटीजीएम क्षेपणास्त्राचा 'इन्फंट्री बटालियन'मध्ये समावेश करण्यात येणार आहे. युद्धामध्ये शत्रूच्या रणगाड्यांना आणि इतर वाहनांना लक्ष्य करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा मोठा उपयोग होणार आहे.
रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र बनवण्यामध्ये भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. क्षेपणास्त्र बनवण्याच्या कार्यक्रमाचं हे मोठे यश आहे, असे डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले.
कमी वजनाच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची डीआरडीओने यशस्वीरीत्या चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र 'मॅन पोर्टेबल' म्हणजेच व्यक्तीलाही हाताळता येणार आहे. क्षेपणास्त्राने ठरवलेले लक्ष्य अचूकपणे भेदले, असे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सद्यस्थितीत भारत रशियन बनावटीचे मिलान - २ आणि कोनकुर्स हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र वापरत आहे. मात्र, ही क्षेपणास्त्रे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे अत्याधुनिक असे एम-पीएटीजीएम क्षेपणास्त्र बनवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी स्वदेश क्षेपणास्त्र बनवण्याच्या कार्यक्रमाला महत्त्व दिले आहे. मागील वर्षी इस्राईलकडून क्षेपणास्त्र आयात करण्याचे नियोजन बदलून स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्यार भर दिला होता.