नवी दिल्ली -आतापर्यंत देशभरात 81 लाख 37 हजार 119 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 1 लाख 21 हजार 641 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच आतापर्यंत 74 लाख 32 हजार 829 कोरोनाग्रस्तांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या देशभरात 5 लाख 82 हजार 649 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 7.16 टक्के आहे.
शनिवारी देशात 48 हजार 268 नवे रुग्ण सापडले असून 551 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 1 लाख 21 हजार 641 वर गेल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली. देशातील मृत्यूदर घसरला असून तो 1.5 टक्क्यांवर आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
दिल्ली
आजपासून दिल्लीतील राज्यांतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू होत असून सर्व सिटांवर प्रवास्यांना बसता येणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी सांगितले. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही, असे ते म्हणाले. प्रवास्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करतानाच मास्क लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सर्व व्होलसेल दारू विक्रेत्यांकडील कामगारांना आरोग्यसेतू अॅप अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दुकानात व्यवहार करताना सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत मास्क हेच प्रभावी औषध असल्याचे सांगितले. सामूहिक संसर्गावर पूर्णत: नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे मास्क हेच औषधरुपी वापरावे, असे ते म्हणाले.