नवी दिल्ली -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि दिल्लीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येसंदर्भात चर्चा केली. या राज्यांना वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'टेस्ट-ट्रॅक-ट्रिट' या रणनितीचा वापर करण्याचे त्यांनी सांगितले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा काही सार्वजनिक ठिकाणांवर लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याने या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या आहवालाचा संदर्भ देत रेमडिसिवीर, हायड्रोक्लोकोक्विन, लोपीनॅवीर या लसींचा कोरोना रुग्णांवर फारसा प्रभाव पडत नसल्याचे मत प्रदर्शित केले. रेमडिसिवीर आणि फॅविपिरॅविर या लशींचा परवानगी नसताना वापर होत असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे स्पष्टिकरण मागितले आहे. विनापरवाना या लशींचा वापर होत असल्याचा आरोप सरकारवर करण्यात आलाय. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती बोपाण्णा आणि रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने केली.
जाणून घ्या देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी... देशात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. सध्या देशात 6 लाख 3 हजार 687 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण कोरोना केसेसच्या 7.51 टक्के आहे.
महाराष्ट्र
राज्यातील नव्या रुग्णांची संख्या गुरुवारी वाढल्याचे निदर्शनास आले, एकाच दिवशी 5 हजार 902 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या 16 लाख 66 हजार 668 वर गेली आहे. तसेच एका दिवसात 506 नवे मृत्यू झाले आहेत. यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 43 हजार 710 झाली आहे. गुरुवारी एकाच दिवसात 7 हजार 883 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 14 लाख 94 हजार 809 झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 27 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दिल्ली
बुधवारी 5 हजार 673 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 60 हजार 571 चाचण्या केल्याने हा आकडा स्पष्ट झाला. दिल्ली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लोकांचे टेस्टींग सुरू केले आहे. यामुळे पहिल्यांदा एकाच दिवसात पाच हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा आकडा दिल्लीने पार केला आहे. याआधी मंगळवारी सर्वाधिक म्हणजे 4 हजार 853 रुग्ण सापडले होते. राज्यभरात एकण 29 हजार 378 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत आतापर्यंत एकूण 3 लाख 70 हजार 14 कोरोना रुग्ण सापडले आहेत.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह ठाकूर आणि त्यांच्या पत्नीला गुरुवारी कोरोनाची लागण झाली. दोघेही होम क्वारन्टाइन आहेत. तसेच ठाकूर यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह हिमाचलचे काही कॅबिनेट मंत्रीही पॉझिटिव्ह सापडले होते. बुधवारी राज्यभरात एकूण 322 पॉझिटिव्ह केसेसे सापडल्या असून आतापर्यंत एकूण 21 हजार 149 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 2 हजार 646 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
पश्चिम बंगाल
बुधवारी पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त रिकव्हरी रेट नोंदवण्यात आला. 3 हजार 925 रुग्णांना एका दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. राज्यभरात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 928 जण बरे झाले आहेत. यामुळे डिस्चार्ज देण्याचा दर 87.90 वर गेला आहे, बुधवारी आणखी 60 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 6 हजार 664 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तेलंगणा
तेलंगणात 1 हजार 504 नवे कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 35 हजार 656 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत 5 बाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 1 हजार 324 झाला आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत 1 हजार 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत एकूण 2 लाख 16 हजार 353 जण बरे झाले आहेत.