नवी दिल्ली -देशात कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्यात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९,९०० वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या (ता. १६ व १७) असे सलग दोन दिवस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला दुपारी ३ वाजता सुरूवात होईल. यात मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतील. मोदींची मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी व सातवी बैठक असेल.
अनलॉक-१ घोषित केल्यानंतर मोदी पहिल्यांदाच बैठक घेणार आहेत. याआधी मोदींनी पाच वेळा बैठक घेतली आहे. १७ जूनला मोदी अन्य राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेणार आहेत. यात ते महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे.