नवी दिल्ली -परराष्ट्र मंत्रालयाने काल(गुरुवार) जारी केलेल्या निवेदनात सीमेवरील परिस्थिती ‘जैसे थे’ करण्याचा आग्रह का नाही? असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. सीमेवरील परिस्थिती आधी होती तशी करण्याबाबत मंत्रालय का बोलत नाही. चीनने सीमेवरील परिस्थिती बदलली आहे, हे सरकारने मान्य केल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.
सीमेवरील तणाव आणि संघर्ष कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले नाही, हा दावा रेटण्याचा प्रयत्न यातून केल्याचे दिसत असल्याचे चिदंबरम म्हणाले.
5 मे 2020 ला सीमेवर जी परिस्थिती होती, ती परिस्थिती पुन्हा आणण्याच्या भारताच्या मागणीवर परराष्ट्र मंत्रालय शांत का? असा सवाल त्यांनी विचारला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग ठाकूर यांनी काल निवेदन जारी केले होते. त्यावर चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारत चीनमध्ये मागील काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. चीनने आक्रमक भूमिका स्वीकारत सीमेवरील अस्पष्ट नियंत्रण रेषेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. गलवान व्हॅली भागात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिक धुमश्चक्रीत शहीद झाले. त्यानंतर तणाव आणखीनच चिघळला आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा सुरु असून अंतिम तोडगा निघाला नाही.