नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून सुरू असलेला भारत-चीन यांच्यातील नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. या संदर्भातील माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
पूर्व लडाखमध्ये ५ मे पासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले. यामुळे सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. यानंतर गलवानमधील हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. तो कमी करण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक चिनी हद्दीत येणाऱ्या मोल्डोमध्ये पार पडली. साडे अकरापासून लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक १२ तास चालली. यात गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
पूर्व लडाखमध्ये तैनात सैनिक मागे घेतले जावेत आणि ५ जूनच्या आधी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशा मागण्या भारताकडून करण्यात आल्या. चीनने आपल्या सीमेवर परत जावे, असे भारताकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. यानंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झाले. आता या निर्णयाची दोन्ही देश अंमलबजावणी करतील, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.
कसा सुरू झाला वाद?
भारत सीमांच्या सुरक्षेसाठी चीनी सीमांपासून एकदम जवळ रस्तेबांधणीचे काम करत आहे. त्यावर चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. प्याँगोग त्सो लेक भागातील डोंगररांगातून भारत रस्तेबांधणी करत आहे. तसेच दारबुक- श्योक- दौलत बेग ओल्डी हे भाग भारतास रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून तेथे रस्ते बांधणीचे आणि जोडणीचे काम चालू आहे. यातील गलवान व्हॅली परिसरातील मुख्य रस्त्यापासून बांधण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांना चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. हा भाग चीनच्या हद्दीतील असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, भारताने याला विरोध केला.
यानंतर दोन्ही देशांनी या सीमेपासून 2 किलोमीटर मागे जाण्याचे ठरले. मात्र, चीनने हा निर्णय लागू केला की नाही, हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी काही भारतीय सैनिक गलवान व्हॅली परिसरातील चेकपोस्ट 14 येथे गेले. मात्र, तेथे चीनचा एक तंबू तसाच होता. खरे तर चीनने हा तंबू काढून न्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तो तसाच ठेवला. त्यामुळे भारतीय सैनिकांनी हा तंबू नष्ट केला. त्याचवेळी चीनी सैनिकही तेथे आले. हातात खिळे आणि तारा ठोकलेल्या काठ्या घेवून चिनी सैनिकांनी निशस्त्र भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. यावेळी लाठ्या, काठ्या आणि हाताने तुंबळ हाणामारी झाली. डोंगर उताराचा भाग असल्याने काही जवान श्योक नदीतही पडले. तर काही कमी तापमान असल्याने जखमी होऊन मृत्युमुखी पडले. यामध्ये चीनचे सैनिकही मारले गेले.
हेही वाचा -लष्करप्रमुखांचा आज लेह भागात दौरा; भारत-चीन सीमा सुरक्षेवर होणार चर्चा
हेही वाचा -कोरोनाचा रुग्ण एका आठवड्यात होतो बरा, औषध शोधल्याचा पतंजलीचा दावा