नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसाच्या लडाख आणि काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही भागातील नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. आज(शुक्रवार) लडाखमध्ये सीमेवर लष्करी तयारीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर सिंह श्रीनगरला रवाना झाले. लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर भारत चीनमध्ये जरी चर्चा सुरु असली तरी आशिया खंडातील दोन बलाढ्य देश एकमेकांबरोबर माईंड गेम खेळताना दिसून येत आहे.
राजनाथ सिंह यांनी आज लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला. मात्र, ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी नाव न घेता चीनवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे सिंह यांनी चीनचे नाव घेणे टाळले. लुकुंग हे ठिकाण पाँग्यांग त्सो तळ्याच्या पश्चिमेकडून असून दोन्ही सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली, तेथून 40 किमीवर आहे. तर मोदींनी लडाखमधील निमू येथील लष्करी चौकीला 3 जुलैला भेट दिली होती.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांत वाद सुरु झाल्यापासून एकदाही भारताचे नाव घेतले नाही. दोन्ही देशांमध्ये आता तणाव निवळण्यासाठी विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. याबाबत शी यांचे काय मत आहे, त्यांनी एकदाही उघड केले नाही. भारत-चीन सीमावाद सुटला पाहिजे. मात्र, किती प्रमाणात याची खात्री देऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह लडाख येथे म्हणाले.