नवी दिल्ली -पँगॉंग तलावाच्या दक्षिणेकडील भागातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पार पडणार आहे. चुशुल/मोल्दो याठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारीही दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडर्समध्ये चर्चा पार पडली होती.
पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमावादासंबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.