नवी दिल्ली -पूर्व लडाखमधीलसीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करामध्ये चुशुल सेक्टरमध्ये ७ सप्टेंबरपासून चर्चा सरू आहे. या बैठकांतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र, चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. शनिवारी दोन्ही देशांतील लष्करात चुशुल सेक्टरमध्ये सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत चर्चा झाली. परंतु, त्यातून काहीही साध्य झाले नाही.
पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला भारतीय सैन्याने मोक्याच्या ठिकाणी ताबा मिळवला आहे. सुमारे ३० उंच ठिकाणी भारतीय सैन्य पहारा देत असून चिनी लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तर सरोवराच्या उत्तरेकडील भागात चीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. गलवान खोऱ्याच्या फिंगर फोर भागात चीनने अतिरिक्त सैन्य जमा केले असून शस्त्रसज्जताही ठेवली आहे. त्यामुळे काही मीटर अंतरावर दोन्ही देशांचे सैन्य आले असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
पुढील काही दिवसांत चर्चेची सहावी फेरी सुरू करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारतीय लष्करातील १४th कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह आणि दक्षिण चीन लष्करी जिल्ह्याचे मेजर जनरल लीऊ लिन यांच्यात २ ऑगस्टनंतर चर्चा झालेली नाही. दोन्ही लष्करांचा एकमेकांवरील विश्वास अत्यंत कमी झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नुकतेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. वँग ई यांच्यासोबत मॉस्कोमध्ये जयशंकर यांनी दोन तास चर्चा केली. यावेळी जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवरील चीनची घुसखोरी आणि चिथावण्यांबाबत चिंता व्यक्त केली. १९९३ आणि १९९६च्या करारांनुसार नियंत्रण रेषेवर अगदी जवळ सैनिक तैनात करण्यास मनाई आहे. असे असतानाही चिनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ येऊन थांबले आहे, तसेच घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. चीनचे सैनिक सीमेवर करत असलेल्या कारवायांमुळे यापूर्वी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांचा भंग होत असल्याचे जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले आहे.