नवी दिल्ली :भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान चर्चेची सहावी फेरी सोमवारी सुरू झाली होती. दोन्ही देशांमधील गैरसमज वाढू नयेत यासाठी सीमेवर आणखी सैनिक तैनात न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सीमेवरील परिस्थिती सध्या जैसे थे ठेवत, आणखी तणाव वाढू नये याकडे दोन्ही देश लक्ष केंद्रित करणार आहेत. यासोबतच, चर्चेची सातवी फेरीही लवकरच आयोजित करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
मंगळवारी याबाबत संयुक्तपणे माहिती देण्यात आली. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये व्यापक प्रमाणात चर्चा झाली. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आले. त्यामुळेच, यापुढे आणखी गैरसमज पसरु नये, आणि तणाव आणखी वाढू नये यासाठी सध्या सीमेवरील सैनिकांमध्ये वाढ न करता, परिस्थिती आहे अशी ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी होकार दर्शवला आहे.