हैदराबाद - वुहान, कोरोना विषाणू, कोरोना विषाणूचे केंद्रस्थान किंवा चीन अशा कोणत्याही शब्दांचा उल्लेख न करता जगभर थैमान घालणाऱ्या या विषाणूच्या उद्रेकबद्दल स्वतंत्र ‘चौकशी’ करण्याचा ठराव जगातील ६२ देशांनी मांडला आहे. सोमवारी जिनिव्हा येथे पार पडलेल्या जागतिक आरोग्य असेंब्लीच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी (डब्ल्यूएचए) ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनने (ईयू) संयुक्तपणे हा ठराव मांडला. तथापी उघडपणे भूमीका न घेणाऱ्या या ठरावाने कोरोनाच्या उद्रेकाबाबत ‘चौकशी किंवा तपास’ करण्याऐवजी या महामारीचे ‘मूल्यमापण’ करण्याची भूमीका घेतली आहे.
या ठरावात सामील झालेल्या देशांमध्ये भारतासहीत अल्बेनिया, बांग्लादेश, बेलारूस, भूतान, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, नॉर्वे, दक्षिण कोरिया, रशिया, तुर्की आणि ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. योगायोगाने अजून तरी युनायटेड स्टेट्सने अद्याप या ठरावाला पाठिंबा दर्शविला नाही.
या ठरावाच्या मसुद्यामध्ये इतर अन्य मुद्द्यांचाही समावेश केला असून या मुद्यांचे निष्कर्ष या ठरावात अभिप्रेत आहेत. त्यामध्ये कोरोना उद्रेकाबाबत “लवकरात लवकर योग्य वेळी पावलं उचलणे त्यासाठी सदस्य देशांचे सल्ले घेणे, निःपक्षपाती स्वतंत्र आणि व्यापक मूल्यमापनासाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करणे, त्याचबरोबर सध्या अस्तित्त्वात असलेल्या यंत्रणा वापरणे, डब्ल्यूएचओ आणि इतर समन्वित आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांनी कोवीड-१९कडून शिकलेल्या धड्यांसोबतच डब्ल्यूएचओची कोवीड-१९ कचऱ्याचे विल्हेवाट लावणारी प्रभावी यंत्रणा आदी बाबींचे पुनरावलोकन करण्याचा समावेशही यामध्ये आहे.
कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू चीन आहे, अशाप्रकारचा आरोप या ठरावात कुठेही केला नाही. पण त्यात असे नमूद केले आहे की, डब्ल्यूएचओने “वैज्ञानिक आणि सहयोगी फील्ड मिशन” योजनेसाठी ‘वर्ल्ड ऑर्गनाझेशन फॉर ॲनिमल हेल्थ’ सोबत काम केले पाहिजे. त्याचबरोबर “विषाणूचा झुनोटिक स्त्रोत शोधण्यासोबतच विषाणूला मनुष्याच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी मदत करणाऱ्या इतर संभाव्य घटकांची भूमीका शोधण्याचा प्रयत्न करावा.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅरिस पेन यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “जागतिक आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या महामारीने आपल्याला अनेक चांगले वाईट धडे शिकवले आहेत. त्याचबरोबर जगाचे रक्षण करण्याची गरजही निर्माण केली आहे. त्यामुळे याचा स्वतंत्र आढावा घेण्यासाठी आमचा या ठरावाला सकारात्मक पाठिंबा आहे.” “भविष्यात येणाऱ्या असल्या संकटांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला सुसज्ज करण्याच्या अनुषंगाने हे सहकार्य करणे गरजेचे आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.
हा ठराव म्हणजे एक विरोधी चाल असेल, असे चीनेने स्पष्ट केले असताना ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांनी जागतिक स्तरावरील जबाबदारी आणि साथीच्या रोगापासून धडा घेण्याचा जोर धरला आहे. अलिकडेच कॅनबेरा येथील चिनी राजदूतांनी ऑस्ट्रेलियाला धमकीवजा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियाने ठरावाबाबतीत अशीच भूमीका कायम ठेवली तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. गोमांस व वाईनची आयात चीनकडून थांबवली जाईल अशी धमकीही चीनी दुतानी दिली आहे.