नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाला 7 दिवसांच्या आत 50 टक्के कर्मचारी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भारतही पाकिस्तानातील आपल्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार आहे. पाकिस्तानचे अनेक अधिकारी, कर्मचारी अवैध आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाला या निर्णयाची माहिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे संबध असल्याचे म्हणत भारताने हा निर्णय घेतला आहे. नुकतेच पाकमधील दोन भारतीय अधिकाऱ्यांचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अपहरण केले होते. तसेच त्यांना हीन वागणूक देण्यात आली होती. याचा उल्लेखही परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात केला आहे.