'डायन' या चक्रीवादळाने उदध्वस्त झालेला मादागास्कर हा छोटासा बेटवजा देश आपत्तीकाळात भारताने वेळेवर आणि भरपूर मदत दिल्याने भारताप्रती कृतज्ञ आहे. मादागास्करचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल रोकोटोनिरिया रिचर्ड यांनी भारत हा आमचा अत्यंत निकटचा मित्र आहे, असे म्हटले आहे. 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या चर्चेमध्ये, लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी भारताला निकटचा मित्र म्हटले आहे. तत्पूर्वी त्यांनी भारताचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्याशी अधिकृत बोलणी केली. लखनऊ येथे आयोजित संरक्षण खात्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आले असताना, त्यांची ही भेट झाली.
पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर असलेल्या बेटवजा देशाला हिंदी महासागरातील आपल्या 'ऑपरेशन व्हॅनिला'च्या माध्यमातून भारतीय नौदलाने गेल्या काही आठवड्यांमध्ये चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या मालागासी देशाला सर्व प्रकारचे सहाय्य दिले. 'आयएनएस ऐरावत'ला ताबडतोब मदत कार्य करण्यासाठी वळवण्यात आले आणि स्थानिकांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारली गेली. लखनऊमध्ये गेल्या आठवड्यात संरक्षण प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राजनाथ सिंग आणि रिचर्ड यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान प्रदेशात सागरी सुरक्षेबाबत सहकार्य वाढवण्याचा प्रमुख मुद्दा होता. व्यापार आणि वाणिज्य यांची भरभराट होण्यासाठी सागरी शेजारी म्हणून दोन्ही देशांवर सुरक्षित सागरी वातावरण राहिल, याची खात्री करण्याची जबाबदारी आहे, यावर राजनाथ यांनी जोर दिला.
लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी त्याबदल्यात हिंदी महासागरातील सागरी प्रदेशात सुरक्षेचे जतन करण्यात भारताकडे अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे, यावर जोर दिला. मादागास्करचे अध्यक्ष राजोएलिना यांनी भारताने दिलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल भारताचे आभार मानणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी असे लिहिले होते की, हिंदी महासागराद्वारे मादागास्करला जोडल्या गेल्याने, भारत हा मादागास्करच्या सुखदुःखात त्याच्या पाठिशी उभा राहण्यास कटिबद्ध आहे. प्रदेशातील सर्वांच्या सुरक्षा आणि विकासासाठी तुमच्याबरोबर काम करण्याकडे मी पहात आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.
हिंदी महासागरातील पाश्चिमात्य प्रदेशात चीन 'जिबौती' या लष्करी तळाच्या माध्यमातून आपला पाया भक्कम करत आहे. यामुळे भारताने आपल्या आफ्रिकन भागीदार देशांशी डावपेचात्मक सहकार्य वाढवले आहे. या धोरणानुसार ६ फेब्रुवारी २०२० रोजी लखनऊ येथे संरक्षण खात्याच्या अकराव्या द्वैवार्षिक प्रदर्शनाच्या दरम्यान भारत आणि आफ्रिकन संरक्षण मंत्र्यांची पहिलीवहिली बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून भारताने नायजेरिया, इथिओपिया आणि टांझानिया या देशांमध्ये संरक्षण अकादमी आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत. बोट्सवाना, नामिबिया, युगांडा, लेसोथो, झांबिया, मॉरिशस, सेशेल्स अशा अनेक आफ्रिकन देशांमध्ये प्रशिक्षण पथके तैनात केली आहेत. तेथे जहाजांच्या सदिच्छा भेटी तसेच संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर जे संयुक्त निवेदन काढण्यात आले, त्यात असे म्हटले आहे की, २०१९ मध्ये मोझांबिकमध्ये 'इदाई' चक्रीवादळादरम्यान भारतीय संरक्षण दलाने केलेल्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती पुनर्वसन कार्यात केलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच २०१८ मध्ये जिबौतीमधून अशाच वेगवेगळ्या कारवायांच्या माध्यमातून मादागास्करसह ४१ देशांच्या अडकलेल्या नागरिकांची सुटका भारताने केली, त्याचेही त्यांनी कौतुक केले. दहशतवाद आणि अतिरेकीवाद, चाचेगिरी, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांची तस्करी यासह संघटित गुन्हेगारीच्या सामायिक आव्हानांना ओळखून संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत अधिक संरक्षण सहकार्याचे आवाहन केले. संरक्षण उद्योगाच्या क्षेत्रात गुंतवणूक, संरक्षण उपकरण सॉफ्टवेअरमध्ये संयुक्त उद्योग, डिजिटल संरक्षण, संशोधन आणि विकास, संरक्षण उपकरणांची तरतूद, सुटे भाग आणि शाश्वत आणि परस्परांना लाभप्रद होईल अशा अटींवर देखभाल यात अधिक सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत, असे या औपचारिक निवेदनात म्हटले आहे.
वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी चर्चा करताना रिचर्ड यांनी उभरत्या अर्थव्यवस्थांच्या संरक्षण क्षमतांमध्ये परिवर्तन घडवण्यात भारत सहाय्य करू शकतो, ही गोष्ट त्यानी अधोरेखित केली. मादागास्करने येत्या २६ जून रोजी त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभास हजर राहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आमंत्रण दिले आहे. स्मिता शर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा काही भाग...
प्रश्न : मादागास्करमध्ये नुकत्याच घडलेल्या चक्रीवादळाने नक्की किती नुकसान झाले, याची जरा माहिती द्या.
लेफ्ट. जन. रिचर्ड : गेल्या संततधार पावसाने अनेक भागांत पूर आले तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अधिकृतपणे, मादागास्करमध्ये २१ जण मृत झाले आणि २० जण बेपत्ता झाले. तसेच, ८० हजार लोक बेघर झाले.