पणजी- गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख राखण्यासाठी हिमाचलच्या धर्तीवर वेगळा कायदा करण्यासाठी संसदेत आग्रह धरणार, असे प्रतिपादन गोवा काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. येथील काँग्रेस भवनात काँग्रेसने गोव्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विरोधीपक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो, आमदार जेनिफर मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले, वस्तू आणि सेवा करार (जीएसटी) आणि नोटाबंदी यामुळे मोठ्याप्रमाणात लोकांना रोजगार गमवावा लागला होता. पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास करण्यासाठी टुरिझम डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्यात येईल. याचा लाभ पर्यटनाशी संबंधितांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच पर्यटकांना व्हिझा ऑन अराव्हल दिला जाईल. तसेच एकवेळ नोंदणी करणाऱ्यांना पुढील तीन वर्षे नोंदणी शुल्कात सवलत दिली जाईल. तर मच्छीमार व्यवसायाला शेती समजले जाऊन शेतीचे सारे लाभ देण्यात येतील. कोणालाही विश्वासात न घेता बनवलेली सीआरझेड अधिसूचना रद्द करणार. तसेच यासाठी पारंपरिक मच्छीमारांना सुट दिली जाईल.