नवी दिल्ली - आज कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी सातव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेरे प्यारे देशवासियो म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणात त्यांनी भविष्यातील संकल्प देशवासीयांपुढे मांडले. यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत, कोरोना संकट, कृषी क्षेत्र, नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन आदी विषयांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील मुद्दे :
पुढच्या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अनेक संकल्प करायचे आहेत. हा काळ त्यासाठीची मोठी संधी आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, जगासाठी प्रेरणादायी ठरला, या लढ्याने अनेकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
भारताने नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की, संपूर्ण जग एक कुटुंब आहे. आपण आर्थिक वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित करत असताना मानवताही निभावली आहे. तसेच मला माझ्या सहकाऱ्यांच्या क्षमता, आत्मविश्वास आणि संभाव्यतेबाबत आत्मविश्वास आहे. एकदा आपण काही करण्याचे ठरवले की, तर ते लक्ष्य साध्य होईपर्यंत विश्रांती घेत नाही.
कोरोनाच्या या काळात प्रत्येक नागरिकानं, आत्मनिर्भरभारत घडवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भरभारत हा केवळ एक शब्द नाही तर एक मंत्र झाला आहे. जगाच्या कल्याणात भारताचेही योगदान गरजेचे आहे. त्यासाठी आधी आपल्याला आपला देश अधिक सक्षम करावा लागेल. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले, तरी आत्मनिर्भर भारतची वाटचाल आता थांबू शकत नाही. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायची आहेत.
आपल्याला आपल्या कृषी क्षेत्राला अधिक सक्षम, आत्मनिर्भर करण्याची गरज असून त्यादृष्टीने अनेक कामे सुरू आहेत. कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेच आहे. त्याचबरोबर ग्रामीण उद्योगांचा विकास करणे ही देखील काळाची गरज आहे.
भारतात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादने आणि वस्तूंचे जगभरात नावाजल्या जातील, असे कार्य आपल्याला करायचं आहे. 'लोकल फॉर वोकल' आपल्या आयुष्याचा मंत्र बनायला हवा. आपल्याला मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड या उद्देशानं काम करायचं आहे.आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संतुलीत विकास गरजेचा आहे.