नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांचे काम थांबवले होते. दरम्यान, जुलै 2020 पर्यंत जाहीर होणारा एनएफएचएस -5 अहवाल आरोग्य मंत्रालयाने 12 डिसेंबर 2020 ला जाहीर केला आहे. यामध्ये कुपोषणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात बालकांमधील कुपोषणात वाढ झाल्याचे अहवालातून स्पष्ट होते. महाराष्ट्रात पाच वर्षांखालील बालकांमधील कुपोषणातील वाढ कायम आहे. तर दुसरीकडे अतिस्थूलतेचे प्रमाण एक टक्क्यावरून 4 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या अहवालातून स्पष्ट होते.
गेल्यावर्षी झाली होती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाला सुरवात-
गेल्यावर्षी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली होती. यामध्ये लोकसंख्या आणि घरगुती प्रोफाइल, विवाह आणि प्रजनन क्षमता, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक, माता आणि मुलांचे आरोग्य, प्रसूती काळजी, लसीकरण, बालपणातील उपचार, पोषण आणि आहार देण्याच्या पद्धती, अशक्तपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यावर निरीक्षण करण्यात आले.
(राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण) एनएफएचएस -5 मध्ये पुनरुत्पादक आणि मुलांचे आरोग्य, प्रजनन व कुटुंब नियोजन, आरोग्य विमा, पोषण यासंबंधी आवश्यक माहिती दिली आहे. एनएफएचएस -5 चा संदर्भ कालावधी 2019-2020 आहे.
कुपोषण चिंतेची बाब-
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 मध्ये कुपोषण ही चिंतेची बाब आहे. 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 5 वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाची टक्केवारी वाढली आहे. तर दुसरीकडे अतिस्थूलतेचे प्रमाण एक टक्क्यावरून 4 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसते. तसेच पाच वर्षांखालील 35 टक्के बालकांची वाढ खुंटली असून एनएफएचएस-4 मध्ये (2015-16) हे प्रमाण 34 टक्के होते.