सहाव्या टप्प्यात भाजप-काँग्रेसला शून्य जागा मिळतील - अखिलेश यादव
त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना 'सप आणि बसपलाच सर्व रेड कार्ड दिली जाणार का? भाजपमधील सर्वजण इतके 'स्वच्छ' आहेत का? त्यांच्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणीच नाही का, ज्याला रेड कार्ड दिले जाऊ शकते?' असे प्रश्न विचारले आहेत.
लखनौ - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तर, काँग्रेसलाही शालीतून जोडे मारले आहेत. 'सहाव्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसला शून्य जागा मिळतील. ७ व्या टप्प्यात त्यांना काही जागा मिळू शकतील. या टप्प्यात भाजपला तर केवळ एक जागा मिळेल,' असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगावर टीका करताना 'सप आणि बसपलाच सर्व रेड कार्ड दिली जाणार का? भाजपमधील सर्वजण इतके 'स्वच्छ' आहेत का? त्यांच्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणीच नाही का, ज्याला रेड कार्ड दिले जाऊ शकते?' असे प्रश्न विचारले आहेत. 'रेड कार्डचा वापर करून भाजप जिंकू इच्छितो. सप आणि बसपच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त रेड कार्ड द्यावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,' असे आरोप त्यांनी केले आहेत.
याशिवाय, 'लोकांना मतदान करण्यापासून अडवले जात आहे. आम्ही मागील खेपेस तुमच्याद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आजही मी तेच करत आहे. लोकांनी मतदान करू नये, यासाठी भाजप लोकांना भीती घालत आहे,' असेही ते म्हणाले. 'भाजप जातीवर आधारित राजकारण करत आहे. विविध जाती आणि धर्मांमध्ये तिरस्कार निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे. त्यांचे सरकार खोटारडेपणा आणि द्वेषावरच आधारित आहे. महाआघाडीचा असे सरकार हाणून पाडण्याचा इरादा आहे,' असे ते म्हणाले.