नवी दिल्ली - कोरोनाच्या संक्रमणामुळे देशात सुमारे दोन महिने लॉकडाऊन आहे. परिणामी औद्योगिक कारखाने, उद्योगधंदे तसेच वाहनांची वर्दळ जवळपास बंद आहे. म्हणूनच प्रदूषणाचा स्तर कमी होऊन पर्यावरणाला दिलासा मिळाला आहे. पर्यावरणाचा हा स्तर टिकवून ठेवायचा असेल तर, राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रदूषणासंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या कठिण परिस्थितीमुळे कारखाने-उद्योग, वाहनांची रहदारी आणि बांधकामात लक्षणीय घट झाली आहे. मात्र, यामुळे पर्यावरणात बदल होऊन हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. प्रकाश जावडेकर यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून इतर काळातही हाच स्तर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
लॉकडाऊन संपून जनजीवन पूर्वपदावर येताच, पर्यावरणात झालेले हे बदल टिकवून ठेवणे अधिक आव्हानात्मक होईल. कारण, लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग आणि रहदारी बंद करण्यात आल्याने ही संधी उपलब्ध झाली. परंतु, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतरही पर्यावरणाचा सुधारलेला समतोल कायम राखण्याकरता प्रयत्न करण्याची संधी आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले. मात्र, हे एक आव्हान असून याकरता प्रत्येक राज्यातील अधिकाऱ्यांना पर्यावरणीय मानदंड आणि प्रदूषण नियंत्रित करणारे नियम व कायद्यांची कडक अंमलबजावणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच, आपल्याला कचरा व्यवस्थापन, औद्योगिक क्षेत्रातून निघणारा धूर, प्रदूषण, नदीची गुणवत्ता आणि उत्सर्जन पातळी यासारख्या गोष्टींच्या क्वांटम सुधारणेकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे जावडेकर म्हणाले. यासोबतच, लॉकडाऊन दरम्यान ध्वनीप्रदूषण कमी होण्यासोबतच, हवा आणि पाण्याच्या प्रदूषणातही लक्षणीय सुधारणा आणि बदल घडून आल्याची माहिती विविध अहवालातून प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
हा जो बेंचमार्क सेट झाला आहे. याला लॉकडाऊननंतरही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे जावडेकर म्हणाले. नागरिकांनी चांगल्या जीवनशैलीकरता पर्यावरण व्यवस्थापनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या जीवनशैलीतील बदलांमुळे पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल, यासाठी त्यांच्या पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
भारतीय तत्वज्ञानानुसार निसर्गाच्या अनुषंगाने शाश्वत जीवनशैलीचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे. मी त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात उत्सुक आहे. पर्यावरणाशी संबंधित सर्व विभागांनी संबंधित नियमांची अंमलबजावणी करून, त्यांचे निरीक्षण करा आणि पर्यावरणातील हे सकारात्मक बदल टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी सर्व विभागांना विनंती करत असल्याचे जावडेकर म्हणाले.