वॉशिंग्टन डी. सी- जगभरामध्ये कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमध्ये सर्वात प्रथम आढळलेला विषाणू आता वेगाने जगातील विविध देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या प्रसारामुळे मोदींची परदेशवारी पुढे ढकलली; युरोपीय संघाच्या परिषदेला राहणार होते उपस्थित
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आणिबाणीच्या परिस्थितीसाठी राखीव निधी असतो. या ठेवीतून ५० अब्ज डॉलर कमी उत्पन्न आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी तत्काळ देणे शक्य असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा -इराणमध्ये आज भारतीय वैद्यकीय पथक पहिले आरोग्यकेंद्र उभारेल, परराष्ट्रमंत्र्यांची माहिती..
जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याने विविध आर्थिक क्षेत्रांवरही परिणाम होत आहे. पर्यटन, व्यापार, वैद्यकीय क्षेत्र, औषधे, प्रवासी वाहतूक, कच्चा तसेच पक्का मालाचा पुरवठा कमी झाला आहे. गरीब देशांना कोरोनाचा सामना करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गरीब देशांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.