नवी दिल्ली - महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा आणि चंदीगढला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचसोबत उत्तर भारतासह दिल्लीतही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या 48 तासांत देशातील विविध भागांत जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पूरपरिस्थिती टाळण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली आहे.
बिहार आणि आसाम..
मागील काही दिवसांपासून आसाम आणि बिहारमध्ये नद्यांनी उग्ररुप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मात्र, या राज्यांतील परिस्थिती आता पूर्ववत होण्याचे संकेत आहे. अनेक भागांतील पुराचे पाणी ओसरले असून जनजीवन पूर्ववत होत आहे. बिहारमधील 16 जिल्ह्यांत मिळून 81 लाख 44 हजार 356 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत पोहोचवली आहे.
आसाममध्ये आतापर्यंत 11 हजार 812 नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. धेमजी, लखीमपूर आणि बक्सा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ओडिशात मुसळधार पाऊस बसरत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत पूरसदृष्ट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंद खोळंबली असून शेतीला देखील नुकसान झाले आहे. ओडिशा आणि तेलंगणात पावसातील घटनांमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बलंगीर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोघांचा भिंत पडल्याने मृत्यू झाला.