डेहराडून (उत्तराखंड) -भारतीय सैन्य अकॅडमीमध्ये आज पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले आहे. उपसेना प्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सैनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात एकूण ३९५ प्रशिक्षणार्थींना (कॅडेट) अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील १८ जण आज लष्करी सेवेत अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. याशिवाय विदेशातील ७० जणांचा यात समावेश आहे.
भारतीय सैन्य अकॅडमीने आतापर्यंत ६२ हजार ९५६ अधिकारी लष्कराला दिले आहेत. यात आजच्या ३२५ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय २ हजार ५७२ विदेशी सैन्यांनी अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. यात आजच्या ७० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आजच्या पासिंग आऊट परेडमध्ये गोवा, सिक्की, पाँडिचेरी, नागलँड, मेघालय, अंदमान निकोबार, त्रिपूरा, लडाख या राज्यातील एकाही प्रशिक्षणार्थीचा समावेश नाही.
विदेशी प्रशिक्षणार्थीमध्ये अफगाणिस्तानचे ४१, भूटानचे १७, मालदीव, मॅरीशियस, म्यानमार आणि श्रीलंका या देशातील प्रत्येकी १-१ प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. तर व्हियतनामचे ३, तझाकिस्तानचे ३ याशिवाय नेपाळचे २ प्रशिक्षणार्थी देखील आजच्या परेडमध्ये अधिकारी होणार आहेत.