नवी दिल्ली - देशभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णाचे प्राण वाचवत आहेत. उत्तराखंडमधील रुडकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयातील डॉक्टरासाठी फेस शील्ड तयार केले आहेत.
फेस शील्ड ही स्पेक्टेकलच्या आकारासारखी दिसते. हे शील्ड अत्यंत सोपे असून सहजरित्या बदलता येते. एका फेस शील्डच्या निर्मितीसाठी 45 रुपये खर्च आला आहे. मोठ्या प्रमाणात शील्ड तयार केल्यास प्रति शिल्डची किंमत केवळ 25 रुपये होईल.
मानवतेच्या कल्याणासाठी दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचार्यांसाठी ही फेस शिल्ड आमच्या बाजूने एक छोटी भेट आहे, असे आयआयटी रुडकीचे प्राध्यापक अक्षय द्विवेदी म्हणाले.
दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2 हजार 902वर पोहचली आहे. तर 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा सर्वांत जास्त धोका वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना आहे. कोरोना महामारीने हजारो नागरिक जीवास मुकले आहेत. चीनमध्ये प्रथम आढळून आलेला कोरोना विषाणू आता जगातील प्रत्येक खंडामध्ये पोहोचला आहे.