दरभंगा(बिहार) -राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. तर अनेकांचा बळी देखील गेला आहे. गावांमध्ये पाणी शिरल्याने दरभंगा जिल्ह्यातील नागरिकांनी बागमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. सरकारचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची व्यथा या पूरग्रस्तांनी मांडली.
सखल भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे उंच भागात आश्रय घेण्यासाठी नागरिकांचे लोंढे येत आहेत. सिरनिया, अम्माधी, सिनुरा या भागातल्या गावांमधील सुमारे 1 हजार कुटुंबांनी सिरनिया नदीच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. त्यांची येथे सरकारने राहण्याची काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च तंबू ठोकले आहेत. आपल्याबरोबर आणलेल्या जनावरांसोबत हालाखीत जीवन काढत आहेत.