सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करु - राहुल गांधी - vote
'सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा 'नियोजन आयोग' आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. यात १०० पेक्षाही कमी लोक असतील,' असे राहुल यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग (NITI - नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया) बरखास्त करू, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
'सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा 'नियोजन आयोग' आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. यात १०० पेक्षाही कमी लोक असतील,' असे राहुल यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होईल. तर, रिझर्व्ह बॅकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींच्या सामान्य नागरिकांपर्यंत ७२ हजार पोहोचवण्याच्या योजनेचे कौतुक केले होते.
राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली होती.