नवी दिल्ली - पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजप-आरएसएसच्या नेत्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'अखंड जम्मू-काश्मीर भारताचा भाग असून तो पाकिस्ताने अवैधरीत्या गिळंकृत केला आहे. पाकिस्तान आणि इम्रान खान यांना स्वतःच्या हिताची चिंता असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,' असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
'पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पाकिस्तान सरकारवर नाराज असून त्यांची पाकिस्तानसोबत राहण्याची इच्छा नाही. त्यांची भारतात येण्याची इच्छा आहे. याबाबत वारंवार माहिती मिळत आहे. ७० वर्षांपासून पाकिस्तानने भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरच्या एक तृतीयांश (1/3) प्रदेशावर अवैधरीत्या कब्जा केला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे,' असे आठवले म्हणाले.
'पाकिस्तानला त्यांच्या भल्याची चिंता असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवावा. इम्रान खान यांना खरोखरच पाकिस्तानच्या हिताची चिंता असेल आणि त्यांना युद्ध नको असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणेच त्यांच्यासाठी चांगले ठरेल,' असा सज्जड इशारा आठवले यांनी दिला.