महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीआरपीएफ नसते, तर मी तिथून जिवंत बाहेर पडलो नसतो - अमित शाह - tmc

'पराभव समोर दिसत असल्यानेच तृणमूल काँग्रेस पुतळा तोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. बंगाल वगळता कुठेही हिंसाचार झाला नाही. येथे लोकशाहीची गळचेपी होत आहे. याला तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत,' असा आरोप शाह यांनी केला आहे.

अमित शाह

By

Published : May 15, 2019, 12:11 PM IST

Updated : May 15, 2019, 12:32 PM IST

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांदरम्यान तुंबळ हाणामारी झाली. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार भडकला होता. तसेच, विद्यासागर महाविद्यालयातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. यानंतर आज अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'सीआरपीएफ नसते तर, मी तिथून जिवंत बाहेर पडलो नसतो,' असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

'पराभव समोर दिसत असल्यानेच तृणमूल काँग्रेस पुतळा तोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे,' असा आरोपही त्यांनी केला. अमित शाह यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगावरही टीका केली. 'टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच पुतळा तोडला. माझ्या रोडशोवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हल्लेखोरांना थांबवले नाही. हिंसाचारानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अटक का झाली नाही? निवडणूक आयोग अद्याप शांत का? निवडणूक आयोगाने बंगालमध्ये बघ्याची भूमिका घेतली आहे. सुरुवातीपासूनच निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा समोर आला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसही पाठिशी घालत आहेत,' असे आरोप शाह यांनी केले आहेत.

'बंगाल वगळता कुठेही हिंसाचार झाला नाही. येथे लोकशाहीची गळचेपी होत आहे. याला तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. इतरही अनेक ठिकाणी भाजपने रॅली केल्या मात्र, कुठेही असा हिंसाचार झाला नाही. कारण इतर कोणत्याही ठिकाणी ममता बॅनर्जी नव्हत्या. मतांच्या राजकारणासाठीच विद्यासागर यांचा पुतळा तोडला. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केलेला नाही. विद्यासागर महाविद्यालयाच्या आत भाजपचे कार्यकर्ते नव्हतेच. पराभव समोर दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठीच हा प्रकार घडवून आणला गेला,' असे शाह यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला जागा मिळण्याच्या शक्यतेविषयी विचारले असता 'कमळच फुलणार,' असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. 'हिंसेचा कितीही चिखल करा पण बंगालमध्ये कमळच फुलणार. भाजप बंगालमध्ये २३ हून अधिक जागा जिंकेल. तर, देशात भाजपला ३०० जागा मिळतील. सहाव्या टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. मात्र, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज नाही. कारण, ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. २३ मेनंतर सर्व वातावरण बदलेल,' असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

Last Updated : May 15, 2019, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details