नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत विचारले असता, आपण घाबरलेलो नाही तर संतापलो आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शाह यांनी दिली. माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? आणि ७० वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
या कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? असे मत त्यांनी व्यक्त केले.
अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, रिचा चड्ढा अशा बॉलिवूडकरांनंतर आता नसरूद्दीन शाहांनीदेखील या कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.
देशातील एक निर्वासित, जो आपल्या मालकीचे सर्वकाही सोडून इथे आला आहे, जो आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत आहे त्याने काय अरबी देशांमध्ये जावे अशी तुमची अपेक्षा आहे का? असा प्रश्न त्यांनी उद्विग्नपणे विचारला. ते पुढे म्हणाले, की हे मी एक मुस्लीम म्हणून नाही बोलत. मी स्वतःला कधी एक मुस्लीम मानलेही नाही, किंवा माझ्या मुस्लीम असण्याकडे मी कधीही अडथळा म्हणून पाहिले नाही.
देशभरात या कायद्याविरोधी सुरू असलेल्या आंदोलनांबाबत शाह म्हणाले, की देशातील युवा वर्ग आता जागा झाला आहे. या आंदोलनांना कोणताही म्होरक्या नाही. हा देशातील युवा वर्गाचा रोष आहे. या रोषाकडे दुर्लक्ष केल्यास, किंवा हा दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यासाठी धोका निर्माण करणे आहे. या सगळ्या प्रकारात सर्वात जास्त दुर्दैवी बाब म्हणजे, विद्यार्थ्यांचा आणि बुद्धिजीवी लोकांचा होत असलेला तिरस्कार.
तुमची प्रसिद्धी कमी झाली तर तुम्ही मराल काय..?
यावेळी बोलताना शाहांनी बॉलिवूडकरांच्या शांत असण्यावर आवाज चढवला. इथले प्रस्थापित लोक का शांत आहेत ते मला माहिती आहे. त्यांची प्रसिद्धी कमी होण्याची भीती त्यांना आहे. मात्र, प्रसिद्धी किंवा व्यवसाय कमी झाल्याने तुम्ही काय मरणार आहात काय? तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढे तुम्ही आधीच कमवून ठेवले आहे ना? हे प्रस्थापित अभिनेते केवळ स्वतःपुरता विचार करतात, आपल्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांचा नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
अनुपम खेर हे 'जोकर' आहेत..
चित्रपटसृष्टीमधील प्रस्थापित शांत असण्याबाबत बोलताना शाह पुढे म्हणाले, की मी ट्विटरसारख्या माध्यमांवर नाही. तिथे असणाऱ्या लोकांनी एक ठाम मत तयार करणे गरजेचे आहे. अनुपम खेर यांच्यासारखे लोक तिथे बरेच 'अॅक्टिव' असतात. मात्र, खेर यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते एक जोकर आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्व सहकाऱ्यांना विचारून तुम्ही त्यांच्या स्वभावाची माहिती करून घेऊ शकता. मात्र, ते त्यांच्या रक्तात आहे, त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही.
दीपिका पादुकोनचे केले कौतुक..
यावेळी शाहांनी दीपिका पादुकोनचे कौतुक केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना भेट देऊन तिने आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. दीपिकासारख्या अभिनेत्रीचे आपण कौतुक करायला हवे. सध्याच्या घडीला वरच्या फळीमध्ये असेलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव येत असूनही, तिने हा पवित्रा घेतला ही नक्कीच धाडसाची बाब आहे. ती हे सर्व कसे हाताळते ते आपण पाहू. या पवित्र्यामुळे तिचे नक्कीच काही चाहते कमी होतील. मात्र, त्यामुळे ती गरीब होणार आहे का? कि तिची एकूण लोकप्रियता कमी होईल? यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये घट होणार आहे का? नाही. असे म्हणत, चित्रपटसृष्टीचा एकमेव देव हा पैसा असल्याचे मत त्यांनी परखडपणे व्यक्त केले.
हेही वाचा : चंद्रशेखर आझादसह अन्य दोघांनी दाखल केली सीएए, एनपीआर अन् एनआरसीविरोधात जनहित याचिका!