नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमांवर केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंदोलनजीवी' असा उल्लेख केला होता. आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी त्यांनी या शब्दाचा वापर केला होता. मात्र, पंतप्रधानांच्या या शब्दावरून नवा वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'होय, मी आंदोलनजीवी आहे आणि त्याचा मला गर्व आहे' असं म्हणत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केलाय.
'मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे. सर्वोत्कृष्ट 'आंदोलनजीवी' हे महात्मा गांधी होते', असे टि्वट चिदंबरम यांनी केले आहे. याचबरोबर स्वराज इंडियाचे अध्यक्ष आणि शेतकरी आंदोलनाशी निगडीत कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही 'होय, मी आंदोलनजीवी आहे' असं म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, माकपा महासचिव सीताराम येचुरी यांनीही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हटलं.